Sunday, 13 November 2016

Jio देणार टीव्ही, ब्रॉडबँड सेवा; केबल, डीटीएच कंपन्यांना भरली धडकी

देशभरातील मोबाईल इंटरनेट क्षेत्रात न भूतो अशी अनपेक्षित खळबळ उडवून देणाऱ्या 'रिलायन्स जिओ'ने आता आपले लक्ष इंटरनेट आधारित वेब स्ट्रीमिंग आणि ब्रॉडबँड सेवांकडे केंद्रीत केले आहे. त्यामुळे लवकरच डीटीएचसोबतच टीव्ही चॅनेल्सच्या क्षेत्रातही दरकपातीचे युद्ध छेडले जाण्याचे संकेत असल्याने या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनाही धडकी भरली आहे.

वेलकम प्रिव्ह्युव ऑफर देऊन वर्षानुवर्षे तळ ठोकून असलेल्या दिग्गज कंपन्यांनादेखील Jio ने चांगलेच हादरवून सोडले आहे. काही कंपन्यांसाठी तर आता अस्थित्त्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे VOLTE (व्हाइस ओव्हर एलटीइ) आधारित मोफत कॉल्स देण्यासाठीही कंपन्यांकडून पाऊले उचलली जात आहेत. VOLTE कॉल्स आणि आजवरच्या अन्य कंपन्यांनी देऊ केलेल्या इंटरनेटची गती पाहता त्या तुलनेत कित्येक पट अधिक आणि त्यातही मोफत ऑफरमुळे केवळ तरुणाइच नव्हे तर महिला वर्ग आणि ज्येष्ठांनाही आकाश ठेंगणे झाले आहे. झाला कधीतरी स्पीड कमी किंवा कधी काही वेळासाठी सेवा बंदही झाली तर फुकटात आणखी काय हवं, असा विचार बहुतांश ग्राहक करताहेत. आम्हाला महिन्याला मोजून मापून १ जीबी वापरण्याची सवय होती आता Jio दिवसाला ४ जीबी देतेय म्हटल्यावर आणखी काय हवं? तर आता जरा कुठे या ऑफरची नवलाई कमी होते न होते तोच Jio ने ग्राहकांना सुखद तर केबलसह डीटीएच आणि ब्रॉडबँड कंपन्यांना जोरदार धक्का देण्याची तयारी चालवली आहे

Jio  ने देशभरात फायबर ऑप्टिकल केबलचे जाळे आधीच टाकून ठेवले असल्याने FTTH (फायबर टू द होम) या माध्यमातून कंपनी तब्बल १ जीबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा देणार आहे. या गतीचा विचार करता इंटरनेटची सुविधा असलेले स्मार्ट टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप्स हे सहज चॅनेल्सपासून ते इंटरनेट रेडिओ, यू ट्युब अशा सेवांचा सहजरित्या वापर करू शकतील. कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली तरीही, केबलच्या माध्यमातून १ जीबीपीएस वेगाने ब्रॉडबँडची यशस्वी चाचणी मात्र अलिकडेच घेतली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह सर्वच शहरांमध्ये Jio ने तीन वर्षांपूर्वीच फायबर ऑप्टिकल केबलचे जाळे विणले आहे. त्यामुळे मोडेमसारख्या माध्यमाच्या माध्यमातून या सेवेने नव्या वर्षात आपल्या केबल वा डीटीएचची जागा घेतल्यास नवल वाटायला नको!

सर्वच टीव्ही स्मार्ट नसतील हे गृहीत धरत सेट टॉप बॉक्स, अँड्रॉइड स्मार्ट बॉक्स किंवा अॅपल टीव्हीचे माध्यम वापरण्याचाही पर्याय Jio च्या विचाराधिन असल्याचे सांगितले जाते. कारण, Jio ने आधीच Jio Play TV, Jio On Demand, Jio Beats आणि Jio Mags सारख्या मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून टीव्ही चॅनेल्स, चित्रपट, इव्हेंट्स, मासिके आणि एक कोटींहून अधिक गाणी देऊन (Digital Contain) आपला पाया भक्कम केला आहे. त्यामुळे या सेवा फायबर ऑप्टिकद्वारे देणे कंपनीसाठी फार कठीण नाही. त्यामुळे आज आपण जे काही मनोरंजन मोबाइलवर अनुभवतोय उद्या ते टीव्हीवरही तितक्याच प्रभावीपणे दिसेल, यात शंका नाही. तर व्हा तयार एका नव्या डिजीटल पर्वाला सामोरं जाण्यासाठी...!


Wednesday, 21 September 2016

WhatsApp पाठोपाठ Google 'आल्लो'

WhatsApp पाठोपाठ Google 'आल्लो'

एखाद्या वनव्यासारखं सोशल मिडियात ताकदीनं टिकून असलेल्या आणि तरुणाईचं सबकूछ असलेल्या व्हॉट्स अॅपची ही जादू पाहून गूगलसारख्या दिग्गज कंपनीनेही अखेर बुधवारी आल्लो म्हणत Allo नावाचं अफलातून मेसेजिंग अॅप लाँच केलंय. म्हणजे फक्त टाइमपास किंवा एखादा फोटो, व्हिडिओ किंवा फाइल पाठवण्यापलिकडेही कितीतरी महत्त्वाचे ऑप्शन्स गूगलने या अॅप्लिकेशनमधून दिलेत. याची खासियत म्हणजे हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर Google Assistant वापरताना आयफोनमधील सिरीची आठवण व्हावी, तसं इंटरॅक्टिव वाटतं. (Smart replies- The smart replies feature allows users to select options from given suggestions. The app learns to give more suggestions based on a user’s usual replies.)
हे अॅप इन्स्टॉल करताच समोरुन कुणीतरी चॅट करतंय की काय, असा भास व्हावा तसं ते तुम्हाला एक एक पर्याय शिकवत पुढे जात असतं. तेही तुमच्या कलेकलेनं.
म्हणजे तुम्हाला रिमाइंडर लावायचा असेल तर त्याला वेळ सांगितली की, आपण पुढच्या ऑप्शन्सकडे निघून जातो. आणि ठरलेल्या वेळेत अलार्म वाजायला सुरुवात होते. What can you do, attractions nearby, Play a game, Show me my emails, Sports News, Movie showtimes, I'm bored असे कित्येक पर्याय समोर असतात. समजा I'm bored वर चॅट केलं तर समोरुन एखादा जोक (इंग्रजीतून) सांगितला जातो. (त्यातले बरेच डोक्यावरुन जाऊ शकतात.) एखादा कॉमेडी व्हिडिओ, हवे तेवढे जोक्स असा काय काय आपल्यापुढे येत जातं. म्हणजे चॅटिंग करताना समोर कुणी पाहिजेच, असंही नाही. तुम्ही हवं तेव्हा हवं ते अगदी ऑर्डर केल्यासारखं मिळवता.

फक्त चॅट म्हटलं तर स्टिकर्स वगळता बाकी बरचसं व्हॉट्स अॅपसारखंच आहे. फोटो, व्हिडिओ, कॅमेरा, अॅटेचमेंट्स, ऑडिओ सारंकाही आहे. वेगळेपण आहे ते Assistant चं. दोन मित्र एकमेकांशी चॅट करताहेत आणि मध्येच एखादा शब्द अडला किंवा एखाद्या ठिकाणचं महत्त्वं, माहिती हवी असेल तर लगेच @google टाइप केलं की, असिस्टंट हजर. मग तुम्हाला हवी ती माहिती तुम्ही विचारायची, तीने दिलेली माहिती तुम्ही ज्या मित्राशी किंवा मैत्रीणीशी चॅट करताय, त्याच्याशी शेअर होईल. एखादं शहर, पुस्तक, कविता असो की आवडीचा कुठलाही विषय, दोघांत तिसरा (Google Assistant) आणता येईल. Play Store मध्ये Google Allo टाइप केलं ते App Install करा. मोबाइल नंबर, नाव, प्रोफाइल फोटो टाकला की तुम्ही पण आल्लो म्हणायला तय्यार☺👍.

गेल्याच आठवड्यात Google ने Duo (ड्युओ) हे व्हिडिओ चॅट अॅप्लिकेशन लाँच करत IMO सारख्या व्हिडिओ चॅट अॅप्लिकेशन्ससमोर पर्याय उभा केला होता आणि आता मेसेजिंग अॅप्लिकेशन लाँच करत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या तंत्रज्ञानाच्या गतीमान वाटेवर स्वार होऊ पाहणाऱ्यांना दणका देत पुन्हा एकदा आपलं प्रस्थ कायम असल्याचंच दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय.
------------------------------











Google Allo, a smart messaging app that helps you say more and do more. Express yourself better with stickers, doodles, and HUGE emojis & text. Allo also brings you the Google Assistant, preview edition.

 

Monday, 19 September 2016

जिओ जी भर के

रिलायन्स Jio ने जवळपास १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा आपली 'मुठ्ठी' उघडत अगदी मोजून मापून इंटरनेट वापरणाऱ्या ग्राहकांना अमर्याद डेटा देत एकप्रकारे JIO जी भरके सरप्राईज दिलंय. गेले कित्येक वर्षं ग्राहकांची गरज आणि व्हॉट्स अॅपमुळे नेटचा वाढलेला वापर याचा गैरफायदा घेत अव्वाच्या सव्वा पैसे आकारत स्वतःचे खिसे भरणाऱ्या मोबाइल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना मात्र Jio ला चांगलंच जमीनीवर आणलं, हेही तितकंच खरं!
कधीकाळी फारतर ९७ रुपयांत महिनाभरासाठी मिळणारा डेटा प्लॅन कंपन्यांनी थेट दिडशे रुपयांवर नेऊन ठेवला गेला आणि आता जिओ लाँच झाल्यानंतर जे वास्तववादी दर खाली आणलेत त्यावरुन आजवर किती कोट्यवधी रुपये ग्राहकांच्या जिवावर कमावले असतील याचा अंदाज यावा. भारतीयांची मानसिकता, दरयुद्ध आणि त्यात Jio बद्दल गेल्या काही दिवसांपासून मुद्दामहून जे काही मेसेज कोणतिही सत्यता न पडताळता पोस्ट होताहेत, त्यातलं वास्तव पाहता हा खोडसाळपणाच वाटावा इतका आततायीपणा त्यातून दिसतो. तुमचा IMEI कंपनीला समजेल, तुम्हाला अमूक बिल येईल, तुमचा मोबाईल दुसऱ्या सीमने चालणार नाही, पहिला स्लॉट म्हणजे त्यांना हवे ते बदल ते करू शकतात अशा कितीतरी अफवा गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियामधून धो-धो वाहताहेत.
मुळात Jio Welcome Offer असो की Jio Preview Offer यात ग्राहकांना सरळ प्री-पेड सीमकार्ड दिले जाताहेत आणि प्री-पेडचं बिल कसं येईल, हा मुद्दाच इथं येत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे IMEI अर्थात  International Mobile Equipment Identity चा. प्रत्येक कम्प्युटरला जसा आयपी किंवा त्याचा स्वतःची ओळख पटविणारा क्रमांक (प्रॉडक्ट कोड) असतो तसाच तो प्रत्येक इलेक्ट्रॉनिक डिवाइसलाही असतो. (उदा. टीव्ही, राऊटर्स, लॅपटॉप इ.) वायरलेस तंत्रज्ञानात हा को़ड युजर्सची (वापरकर्ता) ओळख असतो. डिजीटल कम्युनिकेशनमध्ये त्याची गरज असतेच, किंबहुना या कोडशिवाय सेवा पुरवणं शक्य होत नाही. एवढंच नव्हे तर केवळ याच आयएमइआय वा आयपी अॅड्रेसद्वारे कॉल्स वा इंटरनेटद्वारे एखादं बेकायदा कृत्य घडलंच तर पोलिस वा संबंधित यंत्रणेला त्यामागील दोषीपर्यंत पोहोचणं सहज शक्य होतं. मोबाईलचा हा IMEI ग्राहकाने दिला नाही तरीही तो कोणत्याही सेवा पुरवठादार कंपनीच्या मुख्य यंत्रणेत मोबाईल नंबर व सीम कार्डच्या क्रमांकासोबतच नोंद झालेला असतो. त्यामुळे उगाचच फिरणाऱ्या पोस्ट फॉरवर्ड न केलेल्याच बऱ्या. मोबाईलचा पहिला स्लॉट हा मूळात सर्वाधिक क्षमतेच्या वापरासाठी दिलेला असतो. म्हणजे मोबाईल फोर-जी असेल तर फोरजी साठीची सेटिंग डेटा वापर आणि कॉल्स या सर्व सेवांसाठी पहिल्या स्लॉटला प्राधान्य असतं आणि महत्त्वाचं म्हणजे अन्य सीमसारखंच हेदेखील सीम काढून तुम्ही प्रसंगी दुसरं सीम टाकू शकता. त्यामुळे कुणी एखादी कंपनी तुमचा मोबाईल ब्लॉक करेल, अशी भिती बाळगण्याची गरज नाही. कुणी परस्पर असा मालकीहक्क गाजवू शकत नाही आणि तसा कुणी प्रयत्न केलाच तर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) कार्यरत आहेच!