Sunday 13 November 2016

Jio देणार टीव्ही, ब्रॉडबँड सेवा; केबल, डीटीएच कंपन्यांना भरली धडकी

देशभरातील मोबाईल इंटरनेट क्षेत्रात न भूतो अशी अनपेक्षित खळबळ उडवून देणाऱ्या 'रिलायन्स जिओ'ने आता आपले लक्ष इंटरनेट आधारित वेब स्ट्रीमिंग आणि ब्रॉडबँड सेवांकडे केंद्रीत केले आहे. त्यामुळे लवकरच डीटीएचसोबतच टीव्ही चॅनेल्सच्या क्षेत्रातही दरकपातीचे युद्ध छेडले जाण्याचे संकेत असल्याने या सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनाही धडकी भरली आहे.

वेलकम प्रिव्ह्युव ऑफर देऊन वर्षानुवर्षे तळ ठोकून असलेल्या दिग्गज कंपन्यांनादेखील Jio ने चांगलेच हादरवून सोडले आहे. काही कंपन्यांसाठी तर आता अस्थित्त्वाची लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे VOLTE (व्हाइस ओव्हर एलटीइ) आधारित मोफत कॉल्स देण्यासाठीही कंपन्यांकडून पाऊले उचलली जात आहेत. VOLTE कॉल्स आणि आजवरच्या अन्य कंपन्यांनी देऊ केलेल्या इंटरनेटची गती पाहता त्या तुलनेत कित्येक पट अधिक आणि त्यातही मोफत ऑफरमुळे केवळ तरुणाइच नव्हे तर महिला वर्ग आणि ज्येष्ठांनाही आकाश ठेंगणे झाले आहे. झाला कधीतरी स्पीड कमी किंवा कधी काही वेळासाठी सेवा बंदही झाली तर फुकटात आणखी काय हवं, असा विचार बहुतांश ग्राहक करताहेत. आम्हाला महिन्याला मोजून मापून १ जीबी वापरण्याची सवय होती आता Jio दिवसाला ४ जीबी देतेय म्हटल्यावर आणखी काय हवं? तर आता जरा कुठे या ऑफरची नवलाई कमी होते न होते तोच Jio ने ग्राहकांना सुखद तर केबलसह डीटीएच आणि ब्रॉडबँड कंपन्यांना जोरदार धक्का देण्याची तयारी चालवली आहे

Jio  ने देशभरात फायबर ऑप्टिकल केबलचे जाळे आधीच टाकून ठेवले असल्याने FTTH (फायबर टू द होम) या माध्यमातून कंपनी तब्बल १ जीबीपीएस वेगाने इंटरनेट सेवा देणार आहे. या गतीचा विचार करता इंटरनेटची सुविधा असलेले स्मार्ट टीव्ही, कम्प्युटर, लॅपटॉप्स हे सहज चॅनेल्सपासून ते इंटरनेट रेडिओ, यू ट्युब अशा सेवांचा सहजरित्या वापर करू शकतील. कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली तरीही, केबलच्या माध्यमातून १ जीबीपीएस वेगाने ब्रॉडबँडची यशस्वी चाचणी मात्र अलिकडेच घेतली आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह सर्वच शहरांमध्ये Jio ने तीन वर्षांपूर्वीच फायबर ऑप्टिकल केबलचे जाळे विणले आहे. त्यामुळे मोडेमसारख्या माध्यमाच्या माध्यमातून या सेवेने नव्या वर्षात आपल्या केबल वा डीटीएचची जागा घेतल्यास नवल वाटायला नको!

सर्वच टीव्ही स्मार्ट नसतील हे गृहीत धरत सेट टॉप बॉक्स, अँड्रॉइड स्मार्ट बॉक्स किंवा अॅपल टीव्हीचे माध्यम वापरण्याचाही पर्याय Jio च्या विचाराधिन असल्याचे सांगितले जाते. कारण, Jio ने आधीच Jio Play TV, Jio On Demand, Jio Beats आणि Jio Mags सारख्या मोबाईल अॅप्लिकेशन्सच्या माध्यमातून टीव्ही चॅनेल्स, चित्रपट, इव्हेंट्स, मासिके आणि एक कोटींहून अधिक गाणी देऊन (Digital Contain) आपला पाया भक्कम केला आहे. त्यामुळे या सेवा फायबर ऑप्टिकद्वारे देणे कंपनीसाठी फार कठीण नाही. त्यामुळे आज आपण जे काही मनोरंजन मोबाइलवर अनुभवतोय उद्या ते टीव्हीवरही तितक्याच प्रभावीपणे दिसेल, यात शंका नाही. तर व्हा तयार एका नव्या डिजीटल पर्वाला सामोरं जाण्यासाठी...!


No comments:

Post a Comment